Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

डॉक्टर मला नॉर्मल डिलिव्हरी नको आहे / doctor I dont want a normal delivery

"32 वर्षाची MNC मध्ये काम करणारी स्मृतिका माझ्यासमोर बसली होती तिच्या डिलिव्हरीला तीन आठवडे उरले होते सहाजिकच नॉर्मल डिलिव्हरी च्या दृष्टीने एकदा आतून तपासून बघून बाळाला येण्यासाठी वाट पुरेशी आहे ना त्याची शहानिशा करावी म्हणून मी तिला आतून तपासून बघण्यासाठी परवानगी मागितली. तिने चक्क नकार दिला आणि म्हणाली, "डॉक्टर पण मला नॉर्मल डिलिव्हरी नकोच आहे मला योग्य वेळ पाहून सिझेरियन डिलिव्हरी हवी आहे माझ्या आणि बाळाच्या दृष्टीने सुरक्षित अशी योग्य वेळ तुम्ही मला सांगा त्या दिवशी मी ऍडमिट होईन आणि त्या दिवशी तुम्ही माझे सीझर करा"..

तिची सासू आणि आई तसेच घरातील इतर सर्व मोठे तिच्या या निर्णयाने नाराज होते आणि तिला विरोध करत होते नवरा 'न्यूट्रल' होता तो म्हणाला.... मला काहीही चालेल ; स्मृतीका जो निर्णय घेईल तो मी मान्य करेन.

आज-काल आम्हा स्त्री रोग तज्ञांना अशी परिस्थिती नेहमीच हाताळावी लागते. पेशंट सिझेरियनची डिमांड करत असेल तर तिला नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे एकदा तपशीलवार समजून सांगणे आणि तिचे मन नॉर्मल डिलिव्हरी साठी वळवणे हे आमचे काम असते. त्यानुसार मी बोलायला सुरुवात करणार त्या आधीच ती म्हणाली डॉक्टर तुम्ही माझी बाजू आधी ऐकून घ्या.

  • १.नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या माझ्या मैत्रिणी बहिणी आणि आजूबाजूंच्या स्त्रियांशी मी बोलले आहे नॉर्मल डिलिव्हरीची प्रोसेस ही फार काही सुखावह नसते हे मला माहित आहे.’
  • २.नॉर्मल डिलिव्हरी च्या वेळी होणाऱ्या वेदना या जगातील सर्वोच्च वेदना असतात हे मला माहित आहे.
  • ३.डिलिव्हरी करताना पुन्हा पुन्हा आतून तपासून पहावे लागते. स्त्रीचा योनीमार्ग हा अतिशय सेन्सिटिव्ह असतो आणि योनीमार्गातून पुन्हा पुन्हा तपासतानाही वेदना होतात हेही मला माहित आहे.
  • ४. पहिल्या वेळेला डिलिव्हरी साठी दहा ते बारा तास लागू शकतात आणि बाळाच्या जन्माचा आनंद या सगळ्या वेदनांमुळे स्त्रीला नीट घेता येत नाही हे मी बघितले आहे
  • ५. नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी ही योनी मार्गाला टाके पडतात आणि डिलिव्हरी नंतर या टाक्यांमुळे बसताना उठताना वेदना होतात बाळाला दूध पाजायलाही नीट बसता येत नाही हे खरे आहे की नाही ?
  • ६. डिलिव्हरी नंतर स्त्रीचा योनीमार्ग हा सैल पडतो आणि तो पूर्ववत होत नाही त्यामुळे सेक्स करताना मिळणारा आनंद कमी होतो.
  • ७ एकदा सिझेरियन झाले की पुढच्या वेळी नॉर्मल डिलिव्हरी ची शक्यता कमी असते हेही मला माहित आहे परंतु आम्हाला एकच मूल हवे आहे त्यामुळे तो प्रश्नही माझ्या बाबतीत नाही आहे
  • ८. नॉर्मल डिलिव्हरी ला वेळ काळ काही नसतो रात्री अपरात्री कधीही वेदना सुरू होतात आणि धावपळ करावी लागते ते मला नको आहे .
  • ९.नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणजे आपण जग जिंकले आणि सिझेरियन झाले म्हणजे काहीतरी आपण कमी पडलो अशा प्रकारची मानसिकता माझी मुळीच नाही त्यापेक्षा व्यवस्थित वेळ ठरवून मला माझ्या बाळाचा जन्म आणि आई होण्याचा आनंद अनुभवायचा आहे.
  • १०. केवळ मोठ्यांच्या दबावाला बळी पडून माझी इच्छा नसताना नॉर्मल डिलिव्हरी साठी मी तयार व्हावे असे मला वाटत नाही.
    • १.वेळ ठरवून करता येते त्यामुळे गरोदर स्त्री आणि तिचे कुटुंब यांची अवेळी धावपळ होत नाही टेन्शन येत नाही. .
    • २.सिझर करताना भूल दिलेली असते त्यामुळे वेदना रहित बाळाचा जन्म मी अनुभवू शकते तो आनंद घेऊ शकते.
    • ३.पुन्हा पुन्हा आतून तपासून घेण्याचा त्रास होत नाही योनी मार्गाला पडणाऱ्या चार-पाच टाक्यांपेक्षा सिझेरियनचा पोटावर पडणारा एकच टाका मला जास्त सुरक्षित वाटतो आणि आज काल विरघळणारे टाके सिझेरियनच्या वेळी घेत असल्यामुळे टाके काढण्याचाही काही प्रश्न नसतो. /li>
    • ४.सिझेरियन नंतर सहा तासांनी लगेच मी पाणी पिऊ शकते तसेच बारा ते अठरा तासांनी हलके जेवणही घेऊ शकते.
    • ५.बसताना उठताना अवघड जागेला त्रास होत नाही. सिझर झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी स्वतः उठून हिंडू फिरू शकते बाळाला घेऊन बसू शकते.
    • ६.नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन या दोन्हीला रिकव्हरी साठी लागणारा वेळ हा आजकाल जवळपास सारखाच असतो हे मला माहित आहे.
    • ७. माझ्या अवतीभवती एकच काय ,दोन दोन सिझेरियन झालेल्या अनेक स्त्रिया मी बघितल्या आहेत त्यांच्याशी बोलले आहे त्यांचा सिझेरियन चा अनुभव काही वाईट नव्हता . नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांपेक्षा त्या कुठे मागे आहेत किंवा कुठे कमी पडतात असे मला वाटले नाही.

    खरं सांगू का डॉक्टर आपल्या घरातले लोक आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी बद्दल पूर्ण अशी माहिती देतच नाहीत त्यांना फक्त नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असते परंतु त्या वेळेला होणारा त्रास वेदना आणि सगळी प्रोसेस कोणी नीट सांगत नाही.

  • "माझी बाजू ऐकून घेतल्यानंतर तुम्ही माझ्या मताचा आदर कराल असे मला वाटते " स्मृतिका म्हणाली.
  • नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन या एकमेकींशी तुलना करण्याच्या गोष्टी नाहीच आहेत. हे दोन बाळ जन्माला येण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.
  • दोन्हीचे फायदे तोटे आहेत.
  • डिलिव्हरीच्या वेळेला सगळ्यात महत्त्व आहे ते आई आणि बाळ सुरक्षित असण्याला ... आजही डिलिव्हरी हा स्त्रीचा दुसरा जन्म मानला जातो कारण खरोखरच डिलिव्हरी मग ती नॉर्मल असो केव्हा सिझेरियन ती जोखमीचीच असते. आई आणि बाळ दोघेही जण डिलिव्हरी नंतर सुरक्षित असणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे मला वाटते.

    आज-काल नॉर्मल डिलिव्हरी ही वेदना रहित पद्धतीने करता येते हे आपल्याला माहीत असेलच त्याबरोबरच सिझेरियनच्या वेळी दिली जाणारी भूल ही आजकाल प्रगत झाल्यामुळे ती सुद्धा सुरक्षित असते आणि त्यांनी पाठ दुखी होत नाही हेही आपण जाणता .

    खरोखरच विचार केल्यावर लक्षात येते की नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन दोन्हीही जितक्या सुरक्षित आहेत तितक्याच जोखमीच्या ही.

    ही गोष्ट सुद्धा खरी आहे की घरातील लोक नॉर्मल डिलिव्हरी बद्दल सतत पॉझिटिव्ह आणि सिझेरियन बद्दल सतत निगेटिव्ह बोलत असतात.... त्यामुळे मुली नॉर्मल डिलिव्हरी साठी सतत प्रेशर खाली असतात ..... कितीतरी वेळा सिझर झाले म्हणून मुलींच्या सहनशीलते ला दोष दिला जातो.

    आता हळूहळू बदल होतो आहे ...मुली स्वतःच्या डिलिव्हरी पूर्वी अनेक गोष्टी आपल्या जोडीदाराबरोबर जाणून घेतात त्याबद्दल प्रश्न विचारतात आणि मग जाणतेपणाने डिलिव्हरी मग ती नॉर्मल असो किंवा सिझेरियन ला सामोरे जात आहेत. नॉर्मल डिलिव्हरी ही डिलिव्हरीची नैसर्गिक पद्धत आहे त्यामुळे निसर्गाच्या विरोधात जाऊन नॉर्मल डिलिव्हरी चा त्रास नको म्हणून सरसकट सिझेरियन करून घेणे हे एक डॉक्टर म्हणून मला योग्य वाटत नाही.

    स्मृतिका ही नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आहे आणि तिने मांडलेले मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत. एकाच गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळ्या असतो प्रत्येक मुलीची सहनशीलता ही वेगवेगळी असते त्यामुळे एकच मोजमाप सर्वांना लावणे अवघड आहे.

    सुवर्ण मध्य साधताना गरोदर स्त्री आणि तिचे कुटुंबीय यांनी नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन याबाबतीत कोणताच अट्टाहास न बाळगता टोकाची भूमिका घेणे टाळावे. 'सुरक्षित मातृत्व' हे एकच ध्येय जर पहिल्यापासून गरोदर मुलींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समोर ठेवले तर डिलिव्हरीच्या वेळेला त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळेल आणि ऐनवेळी परिस्थिती बघून योग्य निर्णय घेणे सर्वांच्यासाठी सोपे होईल. .

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811