Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

बाळंतपण शेक शेगडी आणि सायन्स / Childbirth & Science

‘जान्हवी’ ची डिलीव्हरी सुखरूप पार पडली. तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहून झाल्यावर आज ती डिस्चार्ज घेऊन घरी जाणार होती. नेहमी प्रमाणे राउंडला गेल्यावर तिला तपासले आणि सर्व काही ठीक आहे म्हणून सांगितल्यावर जान्हवी च्या आईने तक्रार करत म्हटले,

डॉक्टर ही काही शेक शेगडी मालीश करायला तयार नाही, आज काल हे सगळं जूनं झालाय म्हणते तुम्हीच समजावा आता ; मला तीच हे वागणं अजिबात पटत नाहीये ; जुन्या पद्धती कधी चुकीच्या असतील का डॉक्टर?

हा संवाद आज काल आम्हा स्त्री रोग तज्ञा ना नेहमीच झालाय म्हणून आज आपण आपल्या पद्धती आणि त्यामागचे सायन्स समजावून घेऊ या आणि मग त्या पद्धती पाळायचा की नाही हा निर्णय स्वतः चा स्वतः घेऊया.

  • 1. पहिली प्रथा म्हणजे डिलीव्हरी नंतर सव्वा महिना किंवा ४० दिवस बाहेर न पडणे,काम न करणे. ४० दिवस किंवा सव्वा महिना हा काळ म्हणजे गर्भपिशवी पुन्हा पूर्वी सारखी होण्यासाठी लागणारा काळ होय. गर्भधारणे मुळे झालेले शारीरिक बदल पूर्वस्थितीत येण्यासाठी बरोबर इतकाच वेळ हवा असतो म्हणून ही प्रथा पूर्वजांनी पाडली असावी. प्रेग्नन्सी मध्ये स्त्रीची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते (pregnanacy is an immunosuppressive state) ती वाढण्यासाठी हा काळ महत्वाचा असतो. कोणतेही इन्फेक्शन या काळात पटकन होतात. हे टाळण्यासाठी घराबाहेर पडणे टाळण्याची प्रथा आहे.आपल्या भारतात हवे द्वारे पसरणारा सगळ्यात कॉमन आजार म्हणजे टी. बी.! भारत या या आजारा मध्ये अनेक वर्षे पहिल्या नंबर वर आहे.याआणि प्रतिकार शक्ती कमी झाली की तो होण्याचे चान्सेस वाढतात.मग ती रिस्क कमी करण्यासाठी साठी लोकांच्या मध्ये मिसळणे टाळण्यासाठी साठी बाळंतिणी ला घराबाहेर पडणे आपल्या पूर्वजांनी मना केले असावे हे त्यामागचे सायन्स आहे. पाश्चात्य देशात टी.बी.अगदी दुर्मिळ आहे म्हणून तिथल्या ओल्या ‘बाळंतिणी’ लगेच बाहेर पडतात ड्राईव्ह करतात.दुसरे कारण म्हणजे हा काळ आई आणि बाळाला एकमेका बरोबर ऍडजस्ट करायला मिळावा आणि बाळंतिणी ला विश्रांती मिळावी हा ही हेतू या मागे असतो. हे ही सायन्स च्या दृष्टीने बरोबर आहे.
  • 2.गार पाण्यात हात न घालणे...नवीन आईला पुरेशी झोप मिळत नाही, स्तनपान करण्या मध्ये बाळाचे आवरण्या मध्ये बराच वेळ जातो व त्याकरता बरीच एनर्जी पण लागते. त्यामुळे हे करत असताना तिला घरकामाचे टेन्शन नको म्हणून तिला गार पाण्यात हात घालू नको म्हणतात. (कपडे धुणे भांडी घासणे, फारशी पुसणे ही कामे गार पाण्याने करतात आणि अशी कष्टा ची कामे ओल्या बाळंतिणीने करू नयेत हे त्या मागचे सायन्स आहे, म्हणजे तिची एनर्जी बाळासाठी आणि तिच्यासाठी राखली जाईल)
  • 3. मालीश - डिलीव्हरी नंतर चे मालीश हा एक ‘सोहळा’ असतो. रोज तेल लावून मसाज करून बाळ बाळंतिणीला आंघोळ घालणे आणि मग मस्त शेक देणे यात वेळ कसा निघून जातो कळत नाही.

मालीश करण्याचे फायदे,

  • 1. अंग आणि पाठदुखी कमी होते डिलीव्हरी आणि नंतर सतत स्तनपाना साठी बसून बसून अंग आणि पाठ दुखायला लागते .मालीश हा त्यावर उत्तर उपाय आहे
  • 2. मसल्स रिलॅक्स होतात.
  • 3. स्ट्रेस आणि टेन्शन कमी होण्यास मदत होते.
  • जागरण आणि एकदम बदलेले टाईम टेबल , प्रत्येक बाबतीत आत्ता पर्यंत मोकळे जगायची सवय असते आणि आता एकदम सगळे बदलून बाळा प्रमाणे सगळे सतत ऍडजस्ट करावे लागते त्यामुळे नवीन आई ला हा बदल स्ट्रेस आणि टेन्शन देणारा असतो. ‘मालीश’ मुळे स्ट्रेस कमी होतो हे सायंटिफिकली समोर आले आहे.

  • 4. योग्य पद्धतीने स्तनाचा मसाज केल्यास दुधाच्या गाठी होत नाहीत.
  • 5. हार्मोन्स मुळे त्वचेमध्ये जे बदल झालेले असतात ते जाऊन कांती नितळ आणि मऊ होते. असे अनेक फायदे मालीश मुळे होतात.

मालीश करताना घ्यायची काळजी,

  • 1. मालीश करणारी बाई अनुभवी असावी
  • 2. सीझर नंतर टाके काढले की मालीश करावे
  • 3. सीझर असेल तर पोटाचे मालीश टाळावे
  • आज काल तुम्ही गुगल वर सर्च केल्यास ‘डीलीव्हरी नंतर च्या मालीश’ चे स्पेशल कोर्स उपलब्द्ध आहेत आणि स्पेशल पॅकेजेस पण!

  • 4. शेक देणे - कोळशाची शेगडी पेटवून त्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधी टाकून ती शेगडी पूर्वी बाळ बाळंतिणीच्या कॉट खाली शेक देण्यासाठी ठेवत असत. शेक घेण्याचा उपयोग हा inflamation कमी करण्यासाठी होतो. इतर वेळी ही काही दुखत असेल तर आपण शेकायची पिशवी घेतो च की... तसेच नॉर्मल डिलीव्हरी नंतर चे टाके शेकून त्याच्या भोवतीचे inflamation कमी करणे हा या शेकाचा हेतू असतो तो बरोबरच आहे. तसेच पाठदुखी कमी होण्यासाठी ही शेकाचा उपयोग होतो. आयुर्वेदिक औषधे घालून केलेला धूर हा बाळंतिणीची खोली निर्जंतुक होण्यासाठी उपयुक्त ठरतो. इथे मला हे ही सांगायचे आहे की शेक शेगडी साठी लागणारी कॉट तात्पुराती भाड्याने मिळते त्यामुळे तो ही फार मोठा प्रश्न नाही.
  • 5. आहार – डिलीव्हरी नंतर चा भारतीय आहार हा अगदी योग्य आहार आहे. या मध्ये परंपरेने चालत आलेले काही पदार्थ समाविष्ट असतात. मेथी लाडू , डिंक लाडू , हाळीव लाडू आणि खीर, खसखसी ची खीर इत्यादी. याचा उपयोग हा रक्त वाढणे , कॅल्शियम वाढणे, दूध चांगले येणे या साठी होतो. म्हणजे ही पध्दत ही सायन्स च्या दृष्टीने बरोबरच आहे. बाळं तिणी च्या आहारात पालेभाज्या, मूग आणि तूर डाळ, खोबरं लसूण चटणी याचा समावेश असतो. हे सर्व पदार्थ पचायला हलके, आणि प्रोटीन युक्त असतात त्याची शरीराला झीज भरून येण्यासाठी गरज असते आणि बाळाला ही पचायला हे पदार्थ हलके पडतात. काही पदार्थ खाऊ नका म्हणतात जसे बटाटा , वांगे, हरभरा डाळ , तेलकट तिखट मसालेदार पदार्थ कारण हे पदार्थ ‘वातूळ’ असतात आणि आईच्या दुधातून ते बाळाला गेले की बाळाला पचायला जड जातात.
  • 6. कानात कापूस घालणे - वर म्हटल्याप्रमाणे ही प्रथा ही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आहे. भारतात हवे द्वारे पसरणारे आजार जसे की सर्दी ,खोकला ,टी बी हे कॉमन आहेत आणि कानातले इन्फेक्शन घशात जायला वेळ लागत नाही म्हणून एक्स्ट्रा काळजी म्हणून कानात बोळे घालतात.पण आज काल चांगल्या अँटिबायोटिक मुळे जर तुम्हाला नको वाटत असेल तर ही प्रथा पाळली नाही तरी ठीक आहे असे वाटते.
  • 7. बाळाचे बारसे – १२ किंवा १३ व्या दिवशी करण्याची पद्धत ही सायंटिफिक दृष्टीने योग्य आहे. तुम्हाला माहीतच असेल की परदेशात तर जन्मा आधीच बाळाचे नाव ठरवलेले असते.

बाळाला जितक्या लवकर नाव मिळते तितक्या लवकर त्याची स्वतः ची ओळख त्याला मिळते. त्याच्या नावाची त्याला सवय लवकर होते आणि मग आपण त्या नावाने हाक मारल्यावर बाळ नॉर्मल रिस्पॉन्स देते का हे ही समजते जसे की नावाने हाक मारली की डोळे वळवणे, मान वळवणे, हसून प्रतिसाद देणे इत्यादि नॉर्मल वाढीची लक्षणे आहेत.

जर लवकर नाव च ठेवले नाही आणि बबड्या, सोन्या, मन्या अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्याला बोलवत राहिलो तर ते बाळ ही गोंधळून जाते.

थोडक्यात बाळाच्या ‘ब्रेन स्टीम्युलेशन’ साठी बाळाला लवकरात लवकर नाव ठेवणे योग्य आहे.

कोणतीही गोष्ट पिढ्या न पिढया अनेक वर्षे तग धरून उभी आहे म्हणजे तिला नक्की काहीतरी भक्कम पाया (strong base)आहे नाहीतर ती इतके वर्ष टिकली च नसती नाही का? कदाचित आपल्याला हा पाया माहीत नसेल . त्यामुळे आपल्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती पडताळून घेऊन फॉलो करायला काहीच हरकत नाही.

खरोखरच आनंदाने सव्वा महिना आपण फक्त आपल्या बाळा साठी आणि आपल्यासाठी दिला तर त्यातून दोघांना ही फायदाच आहे की ! बाळ आणि आई यांच्या मध्ये त्यामुळे सुंदर भावबंध तयार होईल तसेच आरोग्याच्या दृष्टीने ही पुढच्या अनेक बारीक सारीक तक्रारी टळतील नाही का ?

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811

Untitled Document