Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

स्त्रियांचे आरोग्य आणि उपवास / Fasting and Women's health

तुम्हा सर्व जणींना 'शारदीय नवरात्रीच्या अनेक शुभेच्छा'!

नवरात्र म्हणजे स्त्री शक्ती चा 'जागर' आहे . म्हणजे ही स्त्रीशक्ती ची पूजा आहे आणि स्त्री ने स्वतः च्या शक्तीची जाणीव इतरांना करून द्यायचा हा काळ आहे.

स्त्री आपल्या शक्तीची आणि बल स्थानांची जाणीव दुसऱ्यांना तेव्हाच करून देऊ शकेल जेव्हा ती जाणीव तिला स्वतः ला झालेली असेल आणि तिचा स्वतः वर पूर्ण विश्वास असेल.

आपल्या स्वतः च्या शक्तीची जाणीव होण्यासाठी शरीर आणि मन हे दोन्ही 'निरोगी' असणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे आरोग्य सांभाळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ' उपवासाचे ' महत्व सांगितले आहे. हा उपवास आरोग्यदायी होण्यासाठी काही नियम पाळणे मात्र गरजेचे आहे.

उपवास या शब्दाचा अर्थ आहे ... 'उप' म्हणजे जवळ आणि 'वास' म्हणजे राहणे . थोडक्यात उपवास म्हणजे 'देवाच्या जवळ राहणे'. मग आपण तर उपवास म्हणजे आहारातील बदल आणि छान उपवासाचे खाणे असे समजतो असे कसे काय?

तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की देवाच्या जवळ राहण्यासाठी आपल्याला मनाची शांती आणि स्थिरता आवश्यक आहे आणि हीच स्थिरता आणि शांती आपल्याला सात्त्विक आहारातून मिळते त्यासाठी उपवासाच्या दिवशी आपण सात्विक आहार घेणे गरजेचे आहे.

वैद्यकीयदृष्ट्या उपवासाचे महत्त्व काय? तर उपवास हा आपल्या पचनसंस्थेला आराम मिळावा म्हणून वैज्ञानिक आणि वैद्यकीय दृष्टीने गरजेचे आहे आपली पचन संस्था ही अविरत चालू असते उपवासाच्या निमित्ताने पचनसंस्थेला पचायला हलका आहार देऊन आपण तिला आराम देणे गरजेचे आहे जेणेकरून तिला थोडी विश्रांती मिळेल आणि ती जास्त चांगल्या प्रकारे आपले कार्य करू शकेल.

व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणे प्रत्येक स्त्रीचे उपास करण्याच्या पद्धत निराळी असते कोणी निर्जळी उपवास करतात तर कोणी फक्त पाणी पिऊन किंवा पेय पदार्थ पिऊन उपवास करतात कोणी फक्त फळे खाऊन उपवास करतात तर कोणी एक वेळा उपवासाचे पदार्थ खातात आणि उपास करतात

मग कोणत्या प्रकारचा उपवास श्रेष्ठ? तर वैद्यकीय दृष्ट्या मी असे म्हणेन की आपली प्रकृती आणि आरोग्य सांभाळून आपल्याला जो झेपेल तो उपवास आपण करावा दुसऱ्यांच्या बरोबर त्याची तुलना करू नये.

पूर्णपणे उपाशी न राहता सात्विक आहार जसे की फळे दूध खाऊन केलेला उपवास हा अधिक चांगला तसेच उपवासाच्या दिवशी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

तेलकट-तुपकट पचायला जड असे पदार्थ उपवासाच्या दिवशी खाणे टाळावे त्यामुळे शरीर जड होते आणि मग पचनसंस्थेवर अतिरिक्त भार येतो त्यामुळे जळजळ होणे पित्त होणे पोटात दुखणे नीट झोप न येणे डोके दुखणे यासारखे त्रास होतात तसेच उपवासाचा मुख्य हेतु म्हणजे देवाची आराधना करणे हाच या सर्व शारीरिक त्रासामुळे नष्ट होतो किंवा बाजूला पडतो.

एखादीला खरोखरच पूर्ण उपाशी राहून उपवास करायचा असेल तर त्याने तिची तयारी किमान एक ते दीड महिना आधीच सुरू करायला हवी. नवरात्र सुरू झाली की पहिल्याच दिवशी एकदम काही न खाता-पिता उपवास करणे धोक्याचे ठरू शकते त्यामुळे जर काही न खाता-पिता उपवास करायचा असेल तर नवरात्रीच्या आधी एक महिना आपला आहार हळूहळू कमी कमी करत जावा आणि शेवटी नवरात्र जवळ येईल त्या वेळेला काही न खाता पिता राहण्याची शरीराला सवय होऊ द्यावी एकदम असा आहार बंद करून उपवास करणे योग्य नाही अशा पद्धतीने पूर्वतयारी केल्यास आपल्या शरीराला ऍडॉप्ट व्हायला वेळ मिळतो आणि मग उपवासामुळे होणारे त्रास होत नाहीत. उपवास करणे कोणी टाळावे

 • १. तर ज्यांना ब्लड प्रेशर डायबेटिस यासारखे आजार आहेत त्यांना उपवास धोकादायक ठरू शकतो
 • २. ज्यांना हार्मोनल असंतुलन आहे जसे की थायरॉईड प्रोलॅक्टीन किंवा इतर कोणतेही हार्मोन कमी-जास्त प्रमाणात आहेत अशा स्त्रियांनी उपवास करणे टाळावे
 • 3. ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त आहे अशा स्त्रियांनीही उपवास करणे टाळावे
 • 4. काही शस्त्रक्रिया झाली असेल तर उपवास करणे टाळावे
 • 5. गरोदर स्त्रियांनी उपवास करू नयेत
 • 6. स्तनपान करणाऱ्या मातांनी ही उपवास करू नयेत

नीट नियोजन न करता उपवास केल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक तोटे होतात जसे की रक्तातील साखर कमी जास्त झाल्यामुळे चक्कर येणे, डोके दुखणे, पाणी कमी प्यायल्यामुळे लघवीला जळजळ होणे, लघवीचे इन्फेक्शन होणे, कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता.

थोडक्यात म्हणजे स्वतःची पूर्ण काळजी घेऊन कोणताही शारीरिक अथवा मानसिक ताण न घेता केलेला उपास हाच खरा फलदायी असे म्हणावे लागेल.

स्त्रियांनी खरोखरच आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या झेपत असेल तरच उपवास करावा केवळ परंपरा आहे म्हणून किंवा आजूबाजूच्या स्त्रिया उपवास करत आहेत म्हणून ओढून-ताणून उपवासाच्या पाठी मागे लागू नये. आणि खरेतर मी असे सांगेन की उपवास करण्यापेक्षा नियमित आहार घेऊन देवाची उपासना करणे हे जास्त आरोग्यदायी आहे. उपासना म्हणजे देवाचे नाव घेणे शांतपणे देवाचे स्मरण करणे देवासाठी वेळ देऊन एकाग्रचित्ताने देवाच्या जवळ बसणे आणि आत्मचिंतन करणे !

चला तर मग आता इथून पुढे उपवास करताना आपण आरोग्यदायी उपवासाची सूत्रे लक्षात ठेवू यात आणि आपला उपवास हा आरोग्यदायी करूयात धन्यवाद!

उपवासाच्या या सूत्रांच्या बद्दल जाणते झाल्यावर मी तुम्हा सर्व जणींना नेहमीच आरोग्यदायी राहण्यासाठी काही कानमंत्र देऊ इच्छिते.

 • १. निरोगी शरीर हाच खरा दागिना हे आपण स्त्रियांनी लक्षात ठेवायला हवे आणि ज्या प्रमाणे मूल्यवान दागिन्यांची आपण काळजी घेतो त्याप्रमाणे आपण स्वतः च्या आरोग्याची हेळसांड न करता काळजी घ्यायला हवी.
 • २. वर्षातून एकदा आवश्यक असणाऱ्या स्क्रीनिगटेस्ट करणे गरजेचे आहे प्रत्येक वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवस हा हेल्थ चेकअप साठी ठेवावा.
 • 3. रात्रीची 8 तास झोप गरजेची आहे झोपण्यापूर्वी 2 तास आधी मोबाईल TV बघू नये.
 • 4. सकाळी 45 मिनिटे व्यायाम गरजेचा आहे.
 • 5. योग्य आणि समतोल आहार हा स्त्री साठी गरजेचा आहे. कित्येक स्त्रियांना सगळ्यांचे जेवण झाल्यावर मागचे उरलेसुरले खाण्याची सवय असते या मुळे नीट पोषण मिळत नाही आणि कित्येकदा लोणची पापड अश्या पदार्थां बरोबर जेवण केल्याने अनावश्यक कॅलरी शरीरात जातात. रात्री उशिरा जेवल्यावर पित्ता सारखे त्रास कायमचे मागे लागतात.

थोडक्यात,

 • 1. पुरेशी झोप
 • 2. नियमित व्यायाम आणि
 • 3. सकस आहार

ही त्रिसूत्री आरोग्यासाठी महत्वाची आहे आणि तिचे पालन प्रत्येकीने केल्यास स्त्री ही खरोखरच शक्ती दायिनी होईल धन्यवाद.

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811