Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

नियोजित गर्भधारणा / Pregnancy Planning

जशी पिढी बदलते तसे माणसाचे विचार ही बदलत जातात आणि नवीन नवीन कल्पना रुजतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वी च्या पिढीतील जोडपी ही मुले बंद करण्यासाठी ' कुटूंब नियोजन' या कल्पनेचा वापर करत असत तर आजच्या पिढीतील जोडपी ही मुले होऊ देण्यासाठी 'नियोजन' (planning) करतात. गेल्या दहा वर्षात अशा 'नियोजित गर्भधारणेचे'(planned pregnancy) प्रमाण ६०% नी वाढले आहे. बदलती जीवनशैली हे या मागचे मुख्य कारण !

सर्वात पहिला प्रश्न म्हणजे गर्भधारणा ही नैसर्गिक गोष्ट आहे तिचे असे नियोजन करणे योग्य आहे का? तर एक स्त्री रोग तज्ञ म्हणून मी असे म्हणेन की ," जी गर्भधारणा (pregnancy) कोणतेही नियोजन न करता होते त्या मध्ये बाळ सुदृढ आणि निरोगी असण्याची शक्यता सर्वात जास्त असते." कारण अशा गर्भधारणेच्या वेळी कोणताही 'ताण'(stress) त्या जोडप्याला नसतो.

मग मुले होऊ देण्याचे नियोजन करायचेच नाही का? असे अजिबात नाही. पण असे नियोजन करताना त्या जोडप्याने काही गोष्टींचा गंभीरपणे विचार करायला हवा.

  • 1. गरज - निशिका च्या सासरी सगळे छान होते . आर्थिक परिस्थिती तसेच एकत्र कुटुंब त्यामुळे घरचा आधार ही होता आणि लग्नाला ही आता वर्ष झाले होते . असे असूनही केवळ इतक्या लवकर कशाला मूल दोन वर्षे तरी नको असे तिच्या मनाने ठाम ठरवले होते म्हणून मीनाताई तिला माझ्या कडे घेऊन आल्या होत्या. तिला पहिला प्रश्न मी विचारला , तुम्हाला मूल हवय हे नक्की ना? या प्रश्नाचे उत्तर जर 'हो' आहे तर मग मूल जितक्या लवकर होईल तेवढे चांगले नाही का? जबाबदारी घ्यायची च आहे मुलाची तर ती लवकर घेतलेली केव्हाही चांगली शरीर आणि मन दोन्ही ची ही शक्ती वयोमानानुसार कमी होत जाते त्यामुळे मुले लवकर मोठी झालेली केव्हाही चांगली . तात्पर्य - खरोखरच प्रेग्नंन्सी पुढे ढकलणे गरजेचे असेल तर च ती पुढे ढकलावी आणि परिस्थिती अनुकूल असेल तर निदान पाहिले मूल तरी लवकर होऊ द्यावे. नवीन लग्न झाल्यावर सासरी रुळायला मुलीला आणि बदलत्या परिस्थितीशी ऍडजस्ट व्हायला मुलाला साधारण १ वर्षाचा काळ लागतो. या काळात एकमेकांना आपण अगदीच विजोड नाही इतका तरी अंदाज येतो दोघांना . मग या कालावधी नंतर संतती चा विचार करायला हरकत नाही असे वाटते.
  • 2. वय - आपण भारतीय आहोत आणि भारतीय लोकांची प्रजनन क्षमता (fertility) ही साधारण २६वर्षा नंतर कमी व्हायला लागते असे शास्त्रीय दृष्टया म्हणतात. त्यामुळे ३० वर्षा च्या आत २ मुले होणे हे योग्य (ideal)असे डॉक्टर म्हणून मी म्हणेन.(होय २मुले ...या बद्दल तुम्ही माझा #2nd चान्स हा लेख वाचा). साहजिकच लग्नानंतर पाहिले मूल कधी हे लग्न कितव्या वर्षी होईल यावर अवलंबून आहे. 21 /22 व्या वर्षी लग्न झाले तर दोन वर्षे ही थांबू शकाल पण 28 व्या वर्षी लग्न झाले तर मात्र प्रेग्नंन्सी साठी घाई करणे योग्य!
  • 3. निरोगीपणा - जर तुम्ही गर्भधारणा लांबवत असाल तर तत्पूर्वी पती आणि पत्नी दोघेही प्रजननाच्या दृष्टीने निरोगी आहेत ना हे लक्षात घ्यायला हवे. याचा ढोबळ ठोकताळा म्हणजे पत्नी ची पाळी नियमित असणे आणि पतीच्या वीर्याची तपासणी निर्दोष (normal) असणे

जर पत्नी ची पाळी अनियमित असेल किंवा पतीच्या वीर्य तपासणी मध्ये काही दोष असेल तर प्रेग्नंन्सी पुढे ढकलणे चांगले नाही. म्हणून जेव्हा तुम्ही ' नियोजित गर्भधारणेचा' (planned pregnancy ) चा विचार पक्का करता तेव्हा स्त्री रोग तज्ञाना दाखवून त्यांचा सल्ला घेणे योग्य होईल.

किती दिवस किंवा किती वर्षे तुम्हाला प्रेग्नंन्सी नको आहे असे विचारले असता ' साधारण २ते ३वर्षे नको डॉक्टर' असे सर्वसाधारण उत्तर असते आणि नंतर काही प्रॉब्लेम नाही येणार गरोदर राहायला अशी हमी सुद्धा पेशंट ला हवी असते. अशी हमी देणे हे कोणत्याही स्त्री रोग तज्ञाला शक्य नसते कारण या काळात जोडप्या मध्ये शारीरिक तसेच हार्मोनल बदल होऊ शकतात ज्यामुळे गर्भधारणा होणे अवघड होऊ शकते.

अश्या काही टेस्ट आहेत का की ज्या जोडप्या ची प्रजनन क्षमता (fertility assessment tests)मोजू शकतात ? याचे उत्तर आहे 'होय' अशा तपासण्या उपलब्ध आहेत की ज्या या घडीला त्या विशिष्ट जोडप्या ची प्रजननक्षमता किती आहे याचा ठोकताळे बांधू शकतात पण तुम्ही प्रेग्नंन्सी किती काळ पुढे ढकलू शकता या चे उत्तर त्या टेस्ट देऊ शकत नाहीत उलट तुमच्या कडे थांबायला अजिबात वेळ नाही आणि लगेच प्रेग्नंन्सी प्लॅन करणे गरजेचे आहे हे मात्र या टेस्ट सांगू शकतात.

पती आणि पत्नी या दोघांच्या सर्व चाचण्या (tests) निर्दोष (नॉर्मल) असल्यातरी २०% जोडप्यांना गर्भधारणे साठी अडचण येते आणि त्याला कोणतेही कारण सापडत नाही (unexplained infertility)

वरील सर्व गोष्टींचा विचार हा बहुतेक वेळा तरुण जोडप्यांनी गांभीर्याने केलेला नसतो त्यांच्या मनात एकच पक्के असते की "आम्हाला इतक्या लवकर प्रेग्नंन्सी नको" . घरातील वडील माणसे जे सांगतात ते सुद्धा ही तरुण मंडळी ऐकत नाहीत. कित्येक जोडपी तर घरातील मोठ्या माणसांच्या अपरोक्ष प्रेग्नंन्सी पुढे ढकलत असतात!

या सगळ्या मुळे होते काय की जेव्हा गर्भधारणा सहज शक्य असते तेव्हा तरुण जोडपी ती अगदी सहज पुढे पुढे ढकलत राहतात आणि जेव्हा त्यांच्या नियोजना(planning) प्रमाणे त्यांना प्रेग्नंन्सी हवी असते तेव्हा निसर्ग साथ देतो च असे नाही परिणामतः प्रेग्नंन्सी ला उशीर होत जातो. वाढते वय, बदलत्या जीवनशैली मुळे झालेले हार्मोनल बदल, शरीरात असणारे आणि पूर्वी निदान न झालेले रचनात्मक दोष (tubal block, incompetant cervix, uterine anamolies, azoosprrmia ) ही त्याची काही कारणे आहेत.

या सगळ्या चा सुवर्ण मध्य साधताना असे म्हणेन,

  • 1. खरोखरच गरज असल्यास नियोजित गर्भधारणे चा पर्याय निवडून प्रेग्नंन्सी पुढे ढकला अन्यथा नियोजन वगैरे नको ; निसर्गत: जेव्हा दिवस राहतील तेव्हा राहू दया.
  • 2. गर्भधारणे चे नियोजन करत असाल तर दोन्ही कडील वडील मंडळी ना विश्वासात घ्या कारण काही अनुवांशिक आजार असतील तर त्याची माहिती घरातील मोठ्या ना असते आणि मग प्रेग्नंन्सी पुढे ढकलावी की नको हे ठरवणे सोपे जाते.
  • 3. जेव्हा तुम्ही नियोजित गर्भधारणेचा (planned pregnancy) चा निर्णय घेत आहत तेव्हा स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्या. काही मूलभूत तपासण्या करणे गरजेचे असल्यास त्या करून घ्या.शेवटी इतकेच सांगेन.

"पहिली प्रेग्नंन्सी केव्हा?? तर जितक्या पटकन शक्य असेल तेव्हा" !

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811