Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

पाळीपूर्व बदल : शारीरिक आणि मानसिक / Premenstrual Syndrome

"अग ऋताअभ्यासाला बस परीक्षा किती जवळ आली आहे माहिती आहे ना तुला?" ऋता ची आई काळजीने ऋताला सांगत होती ऋता मात्र जागेवरून ढिम्म हलली नाही उलट चिडून आईला म्हणाली," आई ,मी आज अजिबात अभ्यास करणार नाहीये एक तर सगळं शरीर जड झाले डोकं दुखतंय आणि मन एकाग्र ही होत नाही अभ्यासात नुसता आळस आलाय आणि काही करावसं वाटत नाहीये". ऋता ची आई काळजीत पडली हल्ली प्रत्येक महिन्यातील ऋता चे काही दिवस असे आळसा मध्ये आणि चिडचिड करण्यात जात असत महत्वाची वर्षे आणि वेळ असा अभ्यास न करता दवडणे परवडणारे नव्हते.

आता दुसरे उदाहरण-- समर ऑफिसमधून संध्याकाळी दमून घरी आला लॅच की ने दार उघडल्यावर समोर नेहा बसलेली होती. "खूप दमलोय ग नेहा ; जरा पाणी आणून देतेस" असं सहज म्हणाला." अरे पाणी तरी स्वतःच्या हाताने घेत जा; घरी आलं की हुकुम सोडण सुरू ;आत्ताच मी जरा काम करून बसले होते काही पाणी नाही देणार मी लगेच घ्या आपल्या हाताने" नेहा चिडून म्हणाली." तुझं करा ,मुलांचे करा कंटाळा आलाय मला". साधं पाणी मागितल्यावर नेहाचा हा अवतार बघून समर चकित झाला. हल्ली नेहा ची चिडचिड वाढली होती तिचा मूड कधी कसा असेल हे ओळखणे कठीण झाले होते काही दिवस ती अगदी छान असायची पण काही दिवस तिची फार चिडचिड व्हायची अगदी लहान-सहान गोष्टींवरून ही त्यामुळे तिच्याशी संवाद कसा साधायचा असा प्रश्न समरला पडत असे.

वरील दोन्ही उदाहरणात तुमच्या लक्षात आली असेल ऋता आणि नेहा चा होणाऱ्या चिडचिडीचा चा त्रास त्या दोघींना स्वतःला तर होतच होता परंतु त्यांच्या कुटुंबियांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत होते आणि त्यांच्याशी संवाद साधणे अवघड झाले होते ऋता करिअरच्या दृष्टीने महत्वाच्या टप्प्यावर होती आणि नेहा चाळीशीला सामोरे जात होती.

दोन्हीही केसेसचा नीट अभ्यास केल्यानंतर आणि काही मूलभूत तपासण्या केल्यानंतर निदान झाले ते 'प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम' चे ! आणि माझ्यावर जबाबदारी होती ती या दोघींना या प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम बद्दल शास्त्रीय माहिती देऊन त्यांच्यावर उपचार करण्याची !

चला तर मग आपणही या दोघींबरोबर जाणून घेऊया की प्रि मेंस्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे काय आणि त्याला कसे सामोरे गेले पाहिजे.

प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम चा शब्दशः अर्थ 'पाळी पूर्व आजार 'असा होईल. पाळीच्या चौदाव्या दिवस आधी पासून ते पाळीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम ची लक्षणे जाणवतात.म्हणजे प्रत्येक महिन्यातील १६ दिवस कमी अधिक प्रमाणात याचा त्रास स्त्रियांना होतो. त्यामुळे जर इतके दिवस हे बदल प्रत्येक महिन्यात सहन करावे लागणार असतील तर त्या विषयी नीट जाणून घेणे आणि त्यानुसार आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

घाबरून जाण्याचे कारण नाही कारण एक तर प्रत्येकीला हा त्रास होतोच असे नाही आणि फक्त ५% स्त्रियांना हा त्रास तीव्र प्रमाणात होतो बाकीच्या ९५% स्त्रियांना जीवनशैलीतील बदल, सकस आहार, आणि व्यायामाने याच्याशी जुळवून घेता येते.

प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम अर्थातच (PMS) ची विभागणी तीन प्रकारात करता येईल,

 • 1. सौम्य
 • 2. मध्यम
 • 3. तीव्र

PMS कशामुळे होतो याचे खरे कारण अजूनही नीट सापडलेले नाही. खालील काही गोष्टी या PMS शी निगडित आहेत असे दिसून येते.

 • 1. शरीरातील हार्मोन्स इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन च्या पातळीमध्ये होणाऱ्या बदलाला मुळे PMS होतो.
 • 2. मेंदूतील सिरोटॉनिन नावाच्या संप्रेरकाची पातळी कमी झाल्यामुळे PMS ची लक्षणे दिसून येतात.
 • 3. इतरही काही हॉर्मोन्स आणि संप्रेराकतील बदल जसे TRH, Prolactin, GABA हे PMS होण्यासाठी कारणीभूत असतात.

कोणाला PMS ला सामोरे जावे लागते?

 • 1. ३० ते ४५ वर्षाच्या स्त्रिया - या वयाच्या स्त्रियांना आयुष्यात पहिली दगदगिची वर्षे संपून थोडी स्थिरता आलेली असते आणि त्या आता स्वतः कडे लक्ष द्यायला लागलेल्या असतात. अशा वेळी त्याना PMS च्या लक्षणांची जाणीव होते.
 • 2. नैराशत्वाशी सामना करणाऱ्या स्त्रीया (depression disorders)
 • 3. बाळंतपणानंतर नैराश्याचा सामना केलेल्या स्त्रिया. (Those who had postpartum depression)
 • 4. तणाव (stress) असेल तर PMS ची लक्षणे जास्त तीव्र असतात.
 • 5. अनुवांशिकता
 • 6. मुलं असणाऱ्या स्त्रियांच्य ा(Those who have children) मध्ये PMS ची तीव्रता जास्त असते.

PMS ची लक्षणे कोणती?

शारिरीक बदलामुळे जाणवणारी लक्षणे जसे की,

 • 1. स्तन दुखणे.
 • 2. वजन वाढणे.
 • 3. पोट जड आणि फुगलेले वाटणे.
 • 4. हात पाय सुजणे.
 • 5. चटकन थकून जाणे
 • 6. नीट झोप न लागणे.
 • 7. चेहऱ्यावर तेलकट पणा आणि मुरूम उठणे.

मानसिक बदलामुळे होणारी लक्षणे.

 • 1. नैराश्य (depression)
 • 2. तणाव (Tension)
 • 3. चलबिचल (restlessness)
 • 4. भूक वाढणे, एखादा विशिष्ट पदार्थ खावासा वाटणे
 • 5. गोंधळणे (confusion)
 • 6. विसराळूपणा
 • 7. डोकेदुखी
 • 8. सारखे रडू येणे
 • 9. विनाकारण चिडचिड

वरील लक्षणा खेरीज सारखे लघवी लागणे, जुलाब अथवा बद्धकोष्ठता, चेहऱ्यावर सूज येणे इत्यादी लक्षणे ही काही जणींना जाणवतात.

PMS चे निदान करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पेशंटची लक्षणे नोंद करणे आणि त्याची वारंवारता लक्षात घेणे. त्याच या करिता काही रक्तपासण्या आणि सोनोग्राफी करणे गरजेचे असते PMS चे निदान हे exclusion पद्धतीने करतात.

तुमच्यापैकी कोणाला जर असा त्रास होत आहे असे वाटत असेल तर एका नोंदवहीत तुमची लक्षणे नोंद करणे गरजेचे आहे.नोंद वही मध्ये खालील गोष्टी नोंद कराव्यात.

 • 1. वय
 • 2. वजन- प्रत्येक 8 दिवसांनी
 • 3. पाळीची तारीख
 • 4. जाणवणारे शारीरिक बदल- जसे स्तन दुखणे , हात पाय दुखणे इत्यादी कोणत्या तारखे पासून सुरु झाले आणि पाळी आल्यावर हे सर्व बंद झाले का?
 • 5. मानसिक बदल - चिडचिड, रडू येणे इत्यादी . कोणत्या तारखेपासून सुरू झाले व पाळी आल्यावर यात काय बदल झाला.

साधारण ३ ते ४ महिने अशी नोंद ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे वारंवारता लक्षात येईल आणि उपचारासाठी या नोंदी चा उपयोग होईल.

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811