Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

संततीनियमन शस्त्रक्रिया : पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया / Birth Control Surgery

"मागच्या लेखात आपण स्त्री नसबंदी शास्त्रक्रिये बद्दलची माहिती घेतली तेव्हा तुमच्या पैकी बऱ्याच जणींनी हा प्रश्न विचारला की स्त्री आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रिये पैकी कोणती शस्त्रक्रिया करावी?

याचे उत्तर असे आहे की संतती नियमनाच्या बाबतीत कोणती पद्धत निवडायची हे त्या जोडप्याने ठरवायचे असते. संतती नियमना ची माहिती घेण्यासाठी जे जोडपे( नेहमी नवरा बायको दोघांनी या समुपदेशना साठी मिळून येणे अपेक्षित असते) येते ते पूर्ण निरोगी असते त्यामुळे त्याला पेशंट न म्हणता ‘क्लायंट’ म्हणतात आणि आम्ही डॉक्टर त्यांना फक्त प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे समजावून सांगतो त्यातील कोणती पध्दत वापरायची हे सर्वस्वी त्या जोडप्याने ठरवायचे असते.इतर वेळी जसे आम्ही हीच ट्रीटमेंट घ्या असे सांगतो म्हणजे तिथे निर्णय आम्ही घेतो तसे इथे नसते.

थोडक्यात स्त्री आणि पुरुष नसबंदी पैकी कोणती शस्त्रक्रिया करायची हे सर्वस्वी त्या जोडप्याने ठरवायचे असते.

पुरुष नसबंदी चे ऑपरेशन हे दोन पद्धतीने करता येते,

 • 1. पारंपरिक पद्धतीने (conventional method)
 • 2. ब्लेड न वापरता शस्त्रक्रिया (no scalpel vasectomy) – ही पद्धत सध्या प्रचलित आहे.

या पद्धतीने ऑपरेशन करताना एक विशिष्ट प्रकारचा चिमटा वापरून अगदी लहान छेदातून हे ऑपरेशन करतात आणि या मध्ये शुक्रनलिकेचा अगदी लहान तुकडा कापून टाकतात व शुक्रनलिका अशा रीतीने बांधतात की शुक्रातंतु चे वहन थांबते आणि मग वीर्या मध्ये शुक्रतंतू मिसळणे थांबून जाते. परिणामी संभोगाच्या वेळी शुक्रतंतू विरहित वीर्य स्त्रीच्या योनीमार्गात सोडले जाते आणि गर्भधारणा होत नाही.

 • 3. पूर्वतयारी - या ऑपरेशन साठी फारशी पूर्वतयारी लागत नाही. मूलभूत रक्त तपासण्या करून बाह्यरुग्ण विभागात हे ऑपरेशन करता येते. ऍडमिट होण्याची गरज नसते.जागच्या जागी भूल देऊन हे ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन नंतर २ तासांनी रुग्ण घरी जाऊ शकतो.
 • 4. हे ऑपरेशन सर्व सरकारी रुग्णालयात तसेच काही खाजगी रुग्णालयात केले जाते खास प्रशिक्षण घेतलेले तज्ञ डॉक्टर हे ऑपरेशन करतात.

ऑपरेशन पूर्वी चे समुपदेशन खूप महत्त्वाचे आहे..त्या पैकी काही मुद्दे पुढीलप्रमाणे,

 • अ. हे ऑपरेशन कायमस्वरूपी संतती नियमना साठी करतात.
 • ब. या ऑपरेशन मुळे पौरुषत्व हिरावले जात नाही, वीर्याचे प्रमाण कमी होत नाही आणि अशक्तपणा ही येत नाही.
 • क. कामतृप्ती (natural sexual pleasure) या ऑपरेशन नंतर कमी होत नाही.
 • ड. करोडो पुरूषांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली आहे आणि त्यांच्या मध्ये या शस्त्रक्रियेचा कोणताही वाईट दूरगामी परिणाम (long term side effects) आढळलेला नाही.
 • इ. या ऑपरेशन चे ‘पलटी ऑपरेशन’ (reversal of vasectomy) सूक्ष्मशस्त्रक्रिया पद्धतीने करता येते आणि ऑपरेशन नंतर प्रेग्नन्सी राहण्याचे प्रमाण ७०% आहे.
 • फ. हे ऑपरेशन नाकाम (fail) होण्याचे प्रमाण ०.५% इतके नगण्य आहे.
 • 5. कोणताही निरोगी पुरुष हे ऑपरेशन करून घेऊ शकतो. या ऑपरेशन साठी पत्नीच्या सहीची गरज नसते.

काही आजार असतील जसे की डायबेटीस, ब्लडप्रेशर, हर्निया, इन्फेक्शन तर जरुरी असणाऱ्या जास्तीच्या तपासण्या करून व लागणारे उपचार घेऊन हे ऑपरेशन करता येते.

 • 6. वर सांगितल्या प्रमाणे हे ऑपरेशन वृषण भागावर (scrotum) अगदी लहान छेद घेऊन करतात व हे ऑपरेशन बिनाटक्याचे असते.

ऑपरेशन नंतर ची काळजी -

 • - जरुरीप्रमाणे वेदना शामक गोळ्या घेणे.
 • - अँटिबायोटिक ची जरूर सहसा पडत नाही.
 • - जखम साधारण 72 तास कोरडी ठेवणे आणि मग त्यावरील ड्रेसिंग काढून टाकणे.
 • - व्यायाम 3 दिवस करू नये.
 • - सायकल किंवा टू व्हीलर एक आठवडा चालवू नये.
 • - ‘स्क्रोटल सपोर्ट’ ६ ते ८ आठवडे वापरणे.
 • - साधारण ३ महिन्यानंतर वीर्य तपासणी करून शुक्रतंतू पूर्ण पणे नाहीसे झाले आहेत याची खात्री करून घेणे अगदी महत्वाचे आहे.
 • - पुरुष नसबंदी शस्त्रक्रिये नंतर किमान ३ महिने संतती नियमना साठी दुसरी तात्पुरती पध्दत वापरणे गरजेचे आहे. ऑपरेशन नंतर किमान २० वेळा तरी वीर्यस्खलन (ejaculation) झाल्याशिवाय शुक्रतंतू वीर्यातून पूर्णपणे नाहीसे होत नाहीत त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता तो पर्यंत असते.
 • - केवळ शारीरिक संबंध टाळून (abstinence) शुक्रतंतु वीर्यातून नाहीसे होऊ शकत नाहीत तर ऑपरेशन नंतर विर्यस्खलन करणे गरजेचे आहे.
 • 7. ऑपरेशन च्या वेळी होणारे धोके – हे ऑपरेशन अगदी सुरक्षित आहे तरीही अगदी कमी प्रमाणात कधीतरी इन्फेक्शन, रक्त साखळणे, ऍलर्जी,मानसिक असंतुलन इत्यादी धोके संभवतात.

स्त्री नसबंदी शी तुलना करता,

 • - स्त्री नसबंदी पूर्ण भूल देऊन किंवा स्पाईनल ऍनास्थेशीया देऊन करतात तर पुरुष नसबंदी ली जागच्या जागी भूल देऊन करतात.
 • - स्त्री नसबंदी ही टाक्यांची शस्त्रक्रिया आहे तर पुरुष नसबंदी ही बिनटक्याची शस्त्रक्रिया आहे.
 • - स्त्री नसबंदी साठी निदान २४ तास ऍडमिट राहणे बंधनकारक आहे तर पुरुष नसबंदी ही ऍडमिट न होता बाह्यरुग्ण विभागात करून पेशंट ला 2 तासात घरी जाता येते.

इतके सोपे असूनही ही पद्धत आपल्या कडे अजूनही फार आवडती नाही याचे कारण आपल्या समाजाची’ मानसिकता ‘ असे म्हणता येईल. या विषयी अजून जागरूक ता करणे गरजेचे आहे. ‘डॉक्टर बाळंतपणाच्या सर्व कळा आणि टाके माझ्या पत्नीने सहन केले आता या ऑपरेशन चा त्रास तिला नको ;त्या ऐवजी मी माझे नसबंदी ऑपरेशन करायला तयार आहे’ असे म्हणणारा एखादा पती जेव्हा भेटतो तेव्हा समाज हळू हळू बदलतो आहे हे जाणवते. जश्या सासवा सुनेला ऑपरेशन करून घे म्हणतात तसे त्यांनी ‘माझा मुलगा करेल ग नसबंदी तू नको काळजी करू’ असे म्हणतील तेव्हा समाजातील एक मोठा वर्ग या स्थित्यंतरासाठी तयार होईल. थोडक्यात हे परिवर्तन घडवणे आपल्या स्त्रियांच्या च हातात आहे. कोणताही मोठा बदल हा एकदम घडत नसतो तर तो जाणीव पूर्वक हळू हळू घडवावा लागतो त्याची सुरवात तुमच्या माझ्या प्रयत्नांनी करूया. तुमच्या प्रेरणेने मी हा लेख लिहला तुम्ही तो वाचा विचार करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना टॅग करा म्हणजे जास्ती जास्त लोक या वर मंथन करू शकतील आणि कदाचित हीच या स्थित्यंतराची सुरवात असेल नाही का?

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811