Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

प्रेग्नंन्सी - एक मानसिक आव्हान / Pregnancy a mental challenge

"वैदेही...वय वर्षे २८. एक अखंड उत्साहाचा झरा.. सुंदर, लाघवी एका MNC मध्ये टीम लीडर. स्वतः चे निर्णय धडाडीने घेऊन कोणतही काम वेळेच्या आधी पूर्ण करणारी. त्यामुळे तिची अशी एक पॉझिटिव्ह ‘इमेज’ होती कंपनी मध्ये . घरी ती आणि सुशांत दोघेच तो ही तिला अगदी अनुरूप ; प्रत्येक गोष्टीत तिला बरोबर घेऊन चालणारा.

सकाळी उठून वेळेत व्यायाम , डाएट चा ब्रेकफास्ट आणि मग ९ वाजता घर सोडले की रात्री ९ ला च दोघे घरी येत. विकेंड ला मस्त हिंडायचे ट्रेकिंग आणि पार्टीज... आयुष्य मस्त जगत होते.... नवीन पिढीच ही; मग प्रेग्नंन्सी चे प्लॅनींग ही परफेक्ट होते त्यांचे... लग्नानंतर 2 वर्षात स्वतः चे घर घेतले आणि आर्थिकस्थैर्य आल्यावर आत्ता तिसऱ्या वर्षी प्लॅन केल्याप्रमाणे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली सगळं कसं आखीव रेखीव सुरु होते.पण..... जशी टेस्ट पॉझिटिव्ह आली तशी वैदेही ला उलट्या मळमळ सुरू झाली.. काही खाता येईना, अशक्त पणा आला , रात्री सारखे बाथरूम ला उठावे लागे त्यामुळे झोप नीट होईना, पोट नीट साफ होईना चीड चिडेपणा वाढला(ही सगळी प्रेग्नंन्सी ची नॉर्मल लक्षणे असतात आणि तुमचे बाळ नीट वाढत आहे हे दर्शवतात ) तिचे सगळे रुटीन च बिघडले. त्यातच मला दाखवून गेल्यावर मी तिला तपासून काही औषधे लिहून दिली आणि आता काय काय काळजी घ्यायला पाहिजे जसे की ट्रॅव्हलिंग नको, बाहेरचे खाणे टाळावे, रात्री 8 तास झोप घेणे आवश्यक आहे आणि हेवी आणि पोटाचे व्यायाम नको असे सांगितले.

इतके सगळे शारीरिक बदल आणि घ्यायची काळजी याच्याशी जुळवून घेताना तिची तारांबळ उडाली. ऑफिस मध्ये तिला गरज पडेल तशी रजा आता घ्यावी लागत असे, रात्री उशिरा पर्यंत पूर्वी सारखे काम करणे शक्य होईना, तिच्या परफॉर्मन्स वर परिणाम होऊ लागला तिच्या कलिग्ज आणि सिनियर्स चा ही असता ती गरोदर आहे म्हटल्यावर तिच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.(हे तुमच्या पैकी खूप जणींनी अनुभवले असेल)लवकरच ती सुट्टी वर जाणार म्हटल्यावर मुख्य डिसीजन्स घेताना पूर्वी इतके तिच्या मताला महत्व दिले जाईना, तिला तिच्या कामाची ओव्हर दुसऱ्या कलिग ला देऊन साधे काम करण्याचा सल्ला देण्यात आला.

आधीच शारीरिक बदल आणि प्रेग्नंन्सी मूळे आलेली बंधने ( ट्रेकिंग आणि पार्टीज बंद, बाहेर खाणे बंद ) त्यात च ऑफिस मध्ये कमी झालेले तिचे महत्व, तिने सुट्टी घेतली तरी सुशांत सकाळी ऑफिस ला गेला की पूर्वीसारखा रात्रीच घरी येत असे त्याला आपले काम कमी करणे नेहमी शक्य होत नसे त्यामुळे तिला घरी आलेला एकटे पणा या मुळे ती ‘नैराश्याच्या गर्तेत’ सापडली आणि सुशांत घाबरून तिला माझ्या कडे समुपदेशना साठी घेऊन आला.

दुसरी केस प्रियांका ची . प्रियांका ‘होममेकर’! लग्नानंतर मस्त चालले होते.ती , नितीश सासू सासरे आणि लहान दीर असे एकत्रच राहात. चुणचुणीत प्रियांका ने सर्वाना आपलेसे करून टाकले होते आपल्या वागण्याने... रोजची घरची बाहेरची कामे , सणवार,पै पाहुणे, कुळाचार सारे काही ती अगदी धडाडीने सांभाळत असे . त्यामुळे प्रियांकाचे नेहमी गुणगान होत असे घरातील सर्व गोष्टी तिला विचारून च केल्या जात. तीन वर्षे पटापट सरली आणि प्रियांकाने गोड बातमी दिली सगळे खूष!पण या बरोबर चालू झालेल्या उलटी मळमळ आणि इतर लक्षणांनी प्रियांका बेजार झाली तिला पूर्वी सारखी प्रत्येक गोष्ट परफेक्ट आणि वेळच्या वेळी जमेना....त्यातच लहान दिराचे नुकतेच लग्न झाले होते त्यामुळे नवीन ‘ जाऊ’आता घरातील सर्व गोष्टी सांभाळू लागली . साहजिकच आता तिचे गुणगान होत असे आणि आता तिच्या मताला जास्त किंमत दिली जाई. शारीरिक बदल आणि बदलती परिस्थिती यामुळे प्रियांका ‘नैराश्याच्या गर्तेत’ सापडली .

अशा कितीतरी वैदेही आणि प्रियांका ज्या प्रेग्नंन्सी च्या पहिल्या तीन महिन्यात ‘नैराश्याच्या गर्तेत’सापडतात त्यांना आम्ही पाहतो. आणि याचे मुख्य कारण म्हणजे ‘प्रेग्नन्सी साठीची मानसिक तयारी आणि मनाची मशागत केलेली नसणे’.

आजकाल सजगतेमुळे नवीन लग्न झालेली जोडपी आर्थिक तयारी पूर्ण झाल्यावरच मुलाचा विचार करतात पण कित्येक वेळा ही जोडपी मानसिक तयारी न करताच प्रेग्नंन्सी ला सामोरी जातात आणि मग परिस्थिती शी जुळवून घेता घेता बेजार होतात.

पूर्वी प्रेग्नंन्सी शी निगडित असणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स चे प्रमाण २०% होते, म्हणजे ८०% स्त्रियांना गरोदरपणात काही अडचण न येता त्या सहज आपले गरोदरपण निभावून नेऊ शकत असत . कुटूंबातून असलेला मानसिक आधार हा त्याचे मुख्य कारण होते.

बदलती जीवनशैली, उशिरा लग्न त्यामुळे उशिरा प्रेग्नंन्सी, विभक्त कुटुंब पद्धती , आहारातील बदल, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा(यामुळे कित्येक धोके आपण आधीच ओळखू शकतो) यामुळे आता प्रेग्नंन्सी कॉम्प्लिकेशन्स चे प्रमाण आता ४०% पर्यंत वाढले आहे. म्हणजे तुम्ही जर ६०% च्या गटात आला तर तुमची प्रेग्नंन्सी सहज पणे पार पडते; पण जर तुम्ही उर्वरित ४०% च्या गटात आला तर मात्र तुमची अशा परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिक तयारी हवी.

मानसिक तयारी म्हणजे नक्की काय करायचे?

पहिली पायरी म्हणजे ‘आता मी गरोदर आहे आणि पुढचे ९महिने माझे बाळ हीच माझी पहिली जवाबदारी आहे त्यामुळे त्याच्यासाठी जरुरी असणाऱ्या सर्व गोष्टी मी आनंदाने करणार आहे ‘ हे स्वतः ला पुन्हा पुन्हा सांगायचे.अशी सकारात्मक मानसिकता तयार झाली की बऱ्याच गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलतो आणि मग लहान सहान गोष्टींचा आपल्या ला त्रास होत नाही.

  • 1. उलटी मळमळ, रात्री पुन्हा पुन्हा बाथरूम ला जावे लागणे, पोट साफ न होणे, जास्त झोप येणे, चिडचिड होणे इत्यादी गोष्टी या हॉर्मोन्स च्या बदला मुळे होत असतात आणि याला प्रेग्नंन्सी च्या ‘वेलकम साईन्स’ असे म्हणतात. म्हणजे या गोष्टी बाळाची वाढ नीट होत आहे हे दर्शवतात. तीन महिन्यांनी यातील बऱ्याच गोष्टी आपोआप कमी होतात.त्यामुळे ह्या गोष्टींशी कसे ऍडजस्ट होता येईल याचा विचार करायला हवा. गरज पडल्यास स्त्री रोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घेणे, पुरेशी विश्रांती घेणे ,आहारातील बदल यांनी या गोष्टींवर मात करता येते.
  • 2. काही वेळेला पहिल्या 3 महिन्यात काहीच पचत नसेल तर पेशंटला ऍडमिट करून सलाईन लावण्याची गरज असते त्यासाठी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सुट्टी ची आवश्यक ता असते. कित्येक वेळा पहिल्या 3 महिन्यात च प्रेग्नंन्सी मुळे सुट्टी घ्यावी लागेल हे पेशंटच्या पचनी पडत नाही आणि त्या साठी ते पटकन तयार होत नाहीत आणि मग परिस्थिती हाता बाहेर जाते.
  • 3. काही वेळेला अचानक उद्भणारे धोके जसे की रक्तस्त्राव होणे आणि त्यामुळे पूर्ण विश्रांती घ्यावी लागणे गरजेचे असते त्यासाठी ही पेशंट मानसिक रित्या तयार नसतात आणि मग एक अश्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांना अवघड जाते.
  • 4. प्रवास आणि हुंदडण्यावर पाहिले 3 महिने बंधने असतात या गोष्टीशी आजच्या तरुणाई ला जुळवून घेणे अवघड जाते. ‘अगदी जवळच जातोय डॉक्टर मग तर चालेल ना?’ असे विचारून त्यांना डॉक्टरांकडून प्रवासाच्या सुरक्षिततेची हमी हवी असते.
  • 5. प्रवासाचे जाऊ द्या हल्ली तर मॉल्स मध्ये फिरताना पण काळजी घ्यायला हवी. तिथली गर्दी त्यामुळे होणारे इन्फेक्शन, पार्कींग पासून मॉल पर्यंत आणि नंतर मॉल मध्ये नकळत भरपूर चालले जाते त्यामुळे ज्यांना इतके चालण्याची रोजची सवय नसते त्या गरोदर मुली हल्ली कित्येक वेळा पोट आणि पाठ दुखी घेऊन येतात.
  • 6. विकेंड पार्टी ज आणि त्यामधील ‘सिगारेट आणि अल्कोहोल वर गरोदरपणात पूर्ण बंदी’ हे कित्येक मुलींच्या पचनी पडत नाही. (दुर्देवाने गरोदर असताना ही सिगारेट न सोडू शकणाऱ्या मुली आजकाल बघायला मिळतात)’पॅसिव्ह स्मोकिंग’ सुद्धा नको असे सांगितल्यावर ‘डॉक्टर मी एकटीनेच का स्मोकिंग सोडायचे बाळ दोघांचे आहे तर याने ही स्मोकिंग सोडायला हवे’ या प्रकारचे संवाद आता नवीन नाहीयेत. यातून विसंवाद होऊन मग जोडप्याची मानसिक ओढाताण होते.
  • 7. म्हणायला जरी ‘WE ARE PREGNANT', छान वाटत असले तरी निसर्ग नियमा नुसार कित्येक गोष्टीतून मुलींनाच जावे लागते आणि त्यासाठी मानसिक दृष्टया कणखर व्हावे लागते.
  • 8. नोकरीच्या ठिकाणी एखादी मुलगी गरोदर आहे म्हंटल्यावर तिच्या कडे बघायचा पूर्ण टीम चा दृष्टीकोन एकदम बदलतो. आता काय ही फारशी पूर्वी सारखी ऍक्टिव्ह राहू शकणार नाही आणि डिलिव्हरी नंतर ची सुट्टी त्यामुळे महत्वाच्या जवाबदारी आणि निर्णय यातून या मुलींना नकळत बाजूला काढले जाते आणि धडाडीने काम करणाऱ्या या मुली एकदम ता बदलाशी जुळवून घेऊ शकत नाहीत व त्यांची चिडचिड वाढते किंवा एकदम त्या डिप्रेशन मध्ये जातात. या बदलाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. ‘ बरे झाले आता मी माझ्या प्रेग्नंन्सी कडे आणखी चांगल्या पद्धतीने पाहू शकेन ‘असा विचार करून पुन्हा पुन्हा स्वतः ला समजवायला हवे.
  • 9. ‘होम मेकर ‘ मुली सुद्धा या परिस्थितीतून जातात. गरोदर असताना पूर्वी इतके टापटीप सगळे न जमल्याने त्यांची चिडचिड होते. आतापर्यंत च्या त्यांच्या चटपटीतपणामुळे घरच्यांच्या त्यांच्या कडून अपेक्षा ही वाढलेल्या असतात. अशा वेळी शांतपणाने जे माझ्या आणि बाळासाठी सर्वोत्तम आहे तेच मी आता करणार हे त्यांनी स्वतः ला बजावून सांगायला हवे.
  • 10. गरोदर पणात १० ते १२ किलो वजन वाढणे बाळाच्या योग्य वाढीसाठी गरजेचे असते.ही वजनातील वाढ आणि त्यामुळे होणारे बाह्यरुपतील बदल स्वीकारण्याची मुलींची मानसिक तयारी झालेली नसते. अनेकदा मुली या वाढणाऱ्या वजनाची काळजी करत बसतात आणि पुरेसा आहार घेत नाहीत. त्यामुळे बाळाची वाढ ही नीट होत नाही. तसेच डिलिव्हरी नंतर ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासून च त्यांना वजन कमी करायचे वेध लागतात. योग्य पध्दतीने स्तनपान करण्यासाठी पुरेसा आहार आवश्यक असतो आणि स्तनपान नीट केले की वजन अपोआप कमी होते हे सत्य आहे आणि त्याप्रमाणे मनाची तयारी करणे गरजेचे आहे.
  • 11. प्रेग्नंन्सी मुळे येणाऱ्या ‘स्ट्रेचमार्क्स’ने ही अनेक मुली व्यथित होतात. बाळाच्या वाढीसाठी त्वचा ताणली जाणे गरजेचे असते. त्वचा ताणली गेल्यानेच बाळाला वाढायला जागा मिळते .त्यामुळे कोणत्याही क्रीम ने ‘ स्ट्रेचमार्क्स’ जात नाहीत ही वस्तुस्थिती समजावून घेणे गरजेचे आहे. याबद्दल मी कुठेतरी वाचले होते ‘you call them strech marks; but I see them as first drawing made by my baby' (स्ट्रेचमार्क्स हे माझ्या बाळाने काढलेले पाहिले चित्र आहे) म्हणजे किती सकारात्मक मानसिकतेने एखाद्या गोष्टी कडे आपण बघू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे नाही का?

सारांश – आर्थिक तयारी बरोबरच पुरेशी विश्रांती, जीवनशैली तील आवश्यक असे लहान सहान बदल,गरज पडेल तेव्हा राजा घेणे आणि ९महिने बाळासाठी सर्वोत्तम असे बदल करण्याची मानसिक तयारी करून जर आपण प्रेग्नंन्सी ला सामोरे गेलो तर होणारी मानसिक ओढाताण टाळता येईल नाही का?

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811